त्रास देणारे लोक तंत्रज्ञानाचा गैरवापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकतात:

  • संगणक, फोन, टॅब्लेट, स्मार्ट घड्याळं किंवा गाड्यांमधील तंत्रज्ञानावर चोरून लक्ष ठेवणे.

  • नको असलेले किंवा धमक्या देणारे मेसेज, व्हॉईस कॉल किंवा ॲपवर मेसेज पाठवणे.

  • इंटरनेटवर वाईट कमेंट्स किंवा फोटो टाकणे.

  • दुसऱ्यांनाही त्रास देण्यासाठी उचकवणे.

  • एखाद्याचे सोशल मीडिया किंवा ईमेल अकाऊंट हॅक करणे.

अशा ट्रॅकिंग आणि त्रासाचा धोका कोणाला जास्त असतो:

तंत्रज्ञानाद्वारे होणारा त्रास कोणासोबतही होऊ शकतो, पण खालील परिस्थिती असलेल्या लोकांना जास्त धोका असतो:

  • तंत्रज्ञान किंवा फोन वापरण्याबाबत कमी माहिती असणे

  • आधी फोन हरवला असणे किंवा वापरण्यावर बंदी असणे

  • पार्टनर किंवा माजी पार्टनर आयटी किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा असणे

  • पार्टनरचे जुने संशयी आणि बंधनं घालणारे वर्तन—जसे की सतत टोचून बोलणे, कोणाशी बोलते त्यावर लक्ष ठेवणे, नातेवाईकांना भेटू न देणे, पैशांवर ताबा ठेवणे किंवा नोकरी करू न देणे.

प्राथमिक चौकशी आणि विचारण्याचे प्रश्न

डिजिटल सेफ्टीची खात्री करणं

नात्यात टेक्नॉलॉजीचा वापर करून त्रास दिला जात असेल तर सर्व्हायव्हर स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो हे आधी पाहा. रिस्क-असेसमेंट प्रश्न वापरून सेफ्टी प्लॅन करता येतो आणि सुरक्षिततेच्या चांगल्या पद्धती सांगता येतात. डिजिटल सेफ्टी वाढवण्यासाठी सर्व्हायव्हर स्वतः वापरू शकेल असा डिजिटल सेफ्टी गाइड डाउनलोड करायला सांगा.

धोका किती आहे हे समजण्यासाठी प्रश्न:

TFGBV चा संशय असेल किंवा डिजिटल त्रासाबद्दल त्यांना काळजी वाटत असेल तर, किती आणि कसा त्रास होतोय हे समजण्यासाठी हे प्रश्न विचारा:

  • तुम्ही कोणती डिव्हाइस वापरता—फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा स्मार्ट डिव्हाइस?

  • तुमच्या डिव्हाइसला आणखी कोणाचा अॅक्सेस आहे? तुम्हाला कधी ते वापरू दिलं जात नाही का?

  • तुमचा फोन तुम्ही कुणासोबत शेअर करता का? तो फोन तुमच्याच नावावर/मालकीचा आहे का?

  • घरी स्मार्ट डिव्हाइस किंवा कॅमेरे आहेत का?

  • तुम्ही कोणते प्लॅटफॉर्म वापरता? ती अकाउंट्स दुसऱ्यांसोबत शेअर आहेत का? त्यात लॉगिन कसं करता?

  • तुमचे पासवर्ड कुणाला माहीत आहेत का? कोणी सहज अंदाज लावून पासवर्ड शोधू शकतं का?

  • फोनचं लोकेशन ऑन आहे का?

  • मुलं असतील तर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या फोन/डिव्हाइसचा अॅक्सेस आहे का?

सर्व्हायव्हरसाठी महत्त्वाचा सल्ला:

  • तुमची सगळी अकाउंट्स लिहून काढा आणि प्रत्येकात लॉगिन कसं करता ते पाहा.

  • परवानगी नसलेला अॅक्सेस थांबवण्यासाठी पासवर्ड आणि सिक्युरिटी प्रश्न बदलण्याचा विचार करा. पार्टनरला तुमच्याबद्दल बरीच वैयक्तिक माहिती माहीत असल्यामुळे तो तुमच्या अकाउंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू शकतो.

  • सगळ्या डिव्हाइसवरच्या अकाउंटमधून साइन आउट करा. त्यामुळे ओळखीची नसलेली डिव्हाइस जोडलेली राहणार नाहीत.

  • ब्राउझरमध्ये सेव्ह केलेले पासवर्ड डिलीट करा.

  • सोशल मीडिया प्रायव्हसी आणि सिक्युरिटी सेटिंग्ज तपासा, म्हणजे काय पब्लिक आहे हे कळेल.

  • तुमची कोणकोणती ऑनलाइन अकाउंट्स आहेत ते तपासा, उदा:

    • फूड डिलिव्हरी (उदा. Swiggy, Zomato)

    • ऑनलाइन शॉपिंग (उदा. FlipKart, Meesho, BlinkIt)

    • बँकिंग/पैशांशी संबंधित (उदा. UPI, बँकिंग, Paytm, PhonePe)

    • टीव्ही/स्ट्रीमिंग (उदा. Netflix, JioHotstar)

    • सोशल मीडिया (उदा. Instagram, Facebook, Telegram, WhatsApp, Snapchat)

स्थान सेटिंग्ज आणि जीपीएस (GPS):

अनेक फोनमध्ये GPS आधीपासून असतो. काही लोकेशन शेअरिंग बंद करता येतं, पण फोन ऑन असेल तर आपत्कालीन सेवा तुमचं लोकेशन मिळवू शकतात.

कोणी तुमचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतं:

  • तुमचं Apple किंवा Google अकाउंट फोनला जोडलेलं असेल तर हरवलेला फोन शोधण्याची सुविधा असते. तुमच्या अकाउंटमध्ये शिरू शकणारा कोणीही तुमचं लोकेशन पाहू शकतो.

  • सोशल मीडिया अॅपमुळे नकळत तुमचं लोकेशन शेअर होऊ शकतं. प्रत्येक अॅपचं लोकेशन आणि प्रायव्हसी सेटिंग तपासा.

  • कॅमेरा आणि फोनमधली अॅप्स फोटो कुठे काढला हे लोकेशन सेव्ह करू शकतात.

  • मित्रांनी तुमचं नाव आणि तुम्ही कुठे आहात हे पोस्ट केल्यामुळेही लोकेशन शेअर होऊ शकतं. इतरांनी ते शेअर करू नये म्हणून प्रायव्हसी सेटिंग बदलता येतात.

GPS ने ट्रॅक केलं जाऊ शकतं हे लक्षात ठेवा. प्रत्येक सोशल मीडिया साइटचं लोकेशन आणि प्रायव्हसी सेटिंग तपासून बदलायला सांगा.

फोनमधील ट्रॅकिंग ॲप्स किंवा स्टॉकरवेअरचा सामना करणे

स्टॉकरवेअर म्हणजे असे छुपे ॲप्स किंवा सॉफ्टवेअर जे तुमच्या नकळत तुमच्या फोनवर लक्ष ठेवतात. त्रास देणारी व्यक्ती तुमच्या कॉल, मेसेज आणि लोकेशनवर नजर ठेवण्यासाठी याचा वापर करते. हे ॲप वापरण्यासाठी कोणाला हॅकर असण्याची गरज नसते; ते कुणीही सहज विकत घेऊन फोनमध्ये इन्स्टॉल करू शकतं. हे बहुधा मोबाईलमध्ये टाकले जाते, पण लॅपटॉप किंवा टॅब्लेटमध्येही असू शकते.

डिव्हाइस विचित्र पद्धतीने वागायला लागलं तर स्टॉकरवेअर असण्याची शक्यता असते—उदा. बॅटरी पटकन संपणं, डेटा अचानक जास्त वापरला जाणं, Screen Time अचानक वाढणं किंवा विचित्र नोटिफिकेशन येणं. ही स्टॉकरवेअरची चिन्हं असू शकतात, पण प्रत्येक स्टॉकरवेअरमुळे अशी चिन्हं दिसतीलच असं नाही. म्हणून सर्व्हायव्हरने स्वतःच्या जाणिवेवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. कोणीतरी फोनवर लक्ष ठेवत असल्याचं मोठं चिन्ह म्हणजे अत्याचार करणाऱ्या व्यक्तीच्या वागण्यात झालेला बदल. उदाहरणार्थ, दुसरं कारण नसताना त्याला तुमच्या फोनवर काय होतंय याबद्दल खूप माहिती असणं.

तुमच्यासोबत काय काय घडतंय त्याची नोंद ठेवली तर उपयोग होतो. त्यामुळे वारंवार काय होतंय हे लक्षात येतं आणि पोलिसांत तक्रार करायची ठरवल्यास आधी काय झालं याचा रेकॉर्ड दाखवता येतो.