काय घडलं?

रुची आणि तरुष गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांसोबत नात्यात आहेत. पण आता रुचीला हे नातं पुढे चालू ठेवायचं नाही. ती तरुषला नातं संपवायचं असल्याचं सांगते. त्यावर तरुष, “तू नातं संपवलंस तर तुझे खासगी फोटो सगळ्यांना पाठवेन,” अशी धमकी देतो. रुची घाबरते आणि काही काळ नात्यात राहते. काही दिवसांनी ती तरीही नातं संपवण्याचा निर्णय घेते. त्यानंतर तरुष तिचे खासगी फोटो आपल्या सगळ्या मित्रांना पाठवतो आणि ते फोटो थोड्याच वेळात अनेक लोकांपर्यंत पोहोचतात.

रुचीला खूप लाज वाटत आहे आणि आता पुढे काय करायचं हे तिला कळत नाही. अशा वेळी आपण रुचीला कशी मदत करू शकतो?

रुचीला कशी मदत करायची?

अनेक हिंसाचारातून वाचलेल्या व्यक्तींना इंटरनेटवर पसरलेले फोटो किंवा व्हिडिओ हटवण्यासाठी मदतीची गरज असते. त्यासाठी खाली दिलेली विशेष साधने उपयोगी ठरू शकतात.

StopNCII.org: सायबर सिव्हिल राइट्स इनिशिएटिव्हच्या मदतीने आणि रिव्हेंज पॉर्न हेल्पलाइनमार्फत हे मोफत आणि विश्वासार्ह साधन उपलब्ध आहे. यात तुमच्या खासगी फोटो किंवा व्हिडिओचा एक वेगळा डिजिटल ठसा तयार करता येतो. फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, रेडिट, बम्बल आणि स्नॅपचॅटसारख्या सहभागी कंपन्या फोटो प्रत्यक्ष न पाहताही हा डिजिटल ठसा ओळखून तो फोटो किंवा व्हिडिओ हटवण्यासाठी त्याचा वापर करू शकतात. फोटो किंवा व्हिडिओ इंटरनेटवर पसरवण्याआधीच ते थांबवण्यासही याची मदत होऊ शकते.

Meri Trustline via RATI Foundation: महिला, मुले आणि वंचित समूहातील लोकांना फोटो किंवा व्हिडिओ हटवण्यासाठी मदत, समुपदेशन आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळू शकते. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत दूरध्वनी, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरून (+९१ ६३६३१ ७६३६३) संपर्क करता येतो.

जर फोटो काढले तेव्हा व्यक्तीचं वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल:

टेकइटडाउन एनसीएमईसी: StopNCII.org प्रमाणेच, ही सेवा १८ वर्षांचे होण्यापूर्वी काढलेले नग्न, अंशतः नग्न किंवा लैंगिक स्वरूपाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवरून हटवण्यासाठी मदत करते.

फोटो किंवा व्हिडिओ हटवण्यासाठी मदत:

अशा प्रसंगी अनेक जण घाबरून लगेच आपली खाती बंद किंवा हटवून टाकतात. पण शक्य असेल तर आधी इंटरनेटवरील पुरावे जतन करून ठेवायला त्यांना सांगा. पोलिसांकडे तक्रार करायची नसली तरी हे पुरावे जपून ठेवणे पुढे उपयोगी ठरू शकते.

पुरावे कसे जतन करायचे हे अधिक जाणून घेण्यासाठी डिजिटल पुरावे गोळा करणे हा धडा पूर्ण करा.


रुचीसोबत जे घडलं ते भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा ठरू शकतो. अशा प्रकारची तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात करता येते. मात्र अशा प्रकरणांसाठी स्थानिक सायबर गुन्हे विभागाकडे मदत घेणे अधिक योग्य ठरू शकते.

तरुषच्या कृतींमध्ये खालील गुन्ह्यांचा समावेश होऊ शकतो:

  • भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३५१ (गुन्हेगारी धमकी): रुचीने नातं तोडू नये म्हणून तिची बदनामी करण्याची किंवा तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याची धमकी देणे.

  • भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २९४: रुचीचे लैंगिक स्वरूपाचे खासगी फोटो इतर लोकांना पाठवणे किंवा पसरवणे.

  • माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६७अ: इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील स्वरूपाची सामग्री पसरवणे.

  • माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६६ई: रुचीची खासगी आणि स्पष्ट छायाचित्रे तिची परवानगी न घेता इंटरनेटवर पसरवणे.

तरुषविरुद्ध तक्रार कशी करायची?

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ नुसार — कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येते आणि तक्रार नोंदवण्यास नकार देता येत नाही.

सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी भारतातील राष्ट्रीय हेल्पलाइन १९३० वर संपर्क करता येतो किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर तक्रार नोंदवता येते. महिला आणि मुलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांसाठी असलेल्या विशेष सुविधेद्वारेही तक्रार करता येते.

तुमच्या तक्रारीसाठी खालील पुरावे जपून ठेवा:

  • ईमेलची प्रत

  • संकेतस्थळाचा पत्ता

  • झालेल्या संभाषणाची प्रत

  • छायाचित्रे किंवा व्हिडिओ